बहुचर्चित आणि अनेक बहुमान प्राप्त कोर्ट पाहण्याचा आज शेवटी योग आला. मे महिन्यातली रखरखीत ऊन असणारी दुपार, त्यात बस मध्ये एक तास प्रवास करत शेवटी ए.सी. मल्टीप्लेक्समधे प्रवेश केला. प्रेक्षकांमध्ये हेडफोन आभूषित तरुण मंडळी, एक नवविवाहित जोडपं आणि काठी टेकवत चालणाऱ्या तीन तरुण तुर्क मैत्रिणी अशा सर्वच वयोगटातील लोकं होती. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास तब्बल ३ आठवडे होऊन देखील सुमारे ४० लोक सिनेमा पहायला आली होती म्हणून मी खुश झालो, मनात विचार आला ‘चला मराठी सिनेमाला अच्छे दिन आले’ पण काहीच वेळाने हा भ्रमनिरास दूर झाला. केवळ चित्रपटाला राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत म्हणून पाहायला आलेली तिशीतली दोन टोळकी देखील होती. युरोपिअन फेस्टिवल सिनेमाची लांबच लांब दृश्य चित्रित करण्याची व वास्तवाचं भेदक चित्रण करण्याची शैली आत्मसात करणारा कोर्ट, scripted reality शोज चवीने पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या पचनी पडला  नाही. तासाभरात हि मंडळी कंटाळली आणि टिंगल टवाळी करू लागली (एकाने ‘अरे Avengers परवडला असता निदान चष्मा लावून 3D पिक्चर तरी बघितला असता’ अशी दर्पोक्ती देखील केली). असो. नाना प्रकृती नाना विचारशैली.

कोर्ट हा एका आरशाप्रमाणे काम करतो. पूर्ण चित्रपटात कुठेही क्लोज-अप्स नाहीत कि वेगवेगळे कॅमेरा angles नाहीत. पार्श्वसंगीत देखील नावापुरतेच आहे. थोडक्यात खूपच मिनिमलीस्टिक पद्धतीने सिनेमा तयार करण्यात आला आहे. तसेच दृश्य चित्रित करताना सिनेमातील मुख्य कलाकारांवर कॅमेरा केंद्रित न करता अथवा कॅमेराने त्यांचा पाठलाग न करता तो स्थिर एका कोपऱ्यातून चित्रण करतो, जसे काही आपण स्वतः तिथे आहोत आणि सर्व घटनांचे मूक साक्षीदार आहोत. ह्या सर्व सामान्य वाटणाऱ्या गोष्टी चित्रपटास रिअलीस्टिक लुक देण्यास कारणीभूत ठरतात. काल्पनिक कथा असूनदेखील ती सत्य असल्याचा भास होतो ह्याचे श्रेय चैतन्य ताम्हाणेस जाते. कोर्ट हि कथा मुळात नावारूपाला आली ती ‘कबीर कला मंच’ च्या केस वरून आणि आनंद पटवर्धन यांच्या जय भीम कॉम्रेड ह्या डॉक्युमेंटरीचा देखील प्रभाव जाणवतो.

नारायण कांबळे ह्या लोकशाहीरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हाखाली अटक होते आणि सेशन्स कोर्टात केस सुरु होते. नारायण कांबळे हा हो अथवा नाही ह्यापेक्षा अधिक काहीही बोलण्यास तयार होत नाही, तो व्यक्त होतो ते फक्त त्याच्या लोकगीतांमधूनच ! अतिशय कमी संवाद असूनदेखील गाण्यांमधील हावभाव व सिनेमातील एकूण वावर ह्यातूनच वीरा साथीदार ह्यांनी नारायण कांबळे पूर्णत्वास नेला आहे. कोर्ट म्हटलं कि युक्तिवाद प्रतिवाद आपल्या डोळ्यासमोर येतो मात्र खऱ्याखुऱ्या कोर्टात यापेक्षाही अधिक पण फारच रटाळ गोष्टी रोज घडत असतात आणि त्या बऱ्यापैकी दाखवून एक प्रकारची  black कॉमेडी निर्माण करण्यात आली आहे. मग ते आरोपांचं मराठी टोन इंग्लिश मध्ये वाचन करून माझं झालं असं म्हणणं असेल, stock विटनेस हा प्रकार असेल किंवा विक्टोरियन कायद्याचा वापर करून युक्तिवाद मांडणे असेल.

मध्यमवर्गीय सरकारी वकील आणि अशिलाचे सुखवस्तू कुटुंबात असणारे वकील यांच्या जीवनशैलीमध्ये असणारी तफावतदेखील प्रकर्षाने जाणवते. रोजच चालणाऱ्या ह्या अशा अगणित खटल्यांमुळे त्रासून जाणीवा बोथट झालेल्या वकिलीण बाई शेवटी वैतागून ‘टाकून द्या ना २० वर्षांसाठी आत’ असं बोलून जातात. जज सदावर्ते हे आपल्याच छोट्याशा कोर्टाच्या दुनियेत आणि त्याच्या नियमांमध्ये मश्गुल असतात. न्यूमेरोलोजीचा आधार घेणारा हा जज कितपत त्या खुर्चीस न्याय देऊ शकेल हा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर देखील मुक्या मुलाच्या कानशिलात भडकावलेल्या चापटेने मिळते व तेथेच अचानक चित्रपट संपतो. अतिशय अनपेक्षितरित्या केलेला हा शेवट मात्र संवेदनशील प्रेक्षकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण करतो.

आता कोर्ट हा सिनेमापुरता मर्यादित न राहता त्याच्या कक्षा रुंदावल्या होत्या. त्याला कारणीभूत अशा दोन बातम्या होत्या. एक म्हणजे चित्रपट पाहिला तो दिवस सेशन्स कोर्टाने चांगलाच गाजवला व निमित्त होते सलमान खानच्या हिट & रन केसचे.   त्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा, चित्रविचित्र वादविवाद आणि नंतर मिळालेली बेल. दुसरी बातमी म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेवर प्रलंबित असलेल्या खटल्यांचा वाढणाऱ्या संख्येबद्दल. (India’s Stagnant Courts Resist Reforms) थोडक्यात सिनेमा केवळ वस्तुस्थितीवर भाष्य करत नाही तर लोकशाहीस कारणीभूत अशा न्याय व्यवस्थेत असणाऱ्या ज्वलंत मात्र दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाकतो.

टीप: केवळ निर्बुद्ध मनोरंजन हाच हेतू असेल अशा प्रेक्षकांनी व पुरस्कार प्राप्त सिनेमा आहे म्हणून हा सिनेमा पाहू नये. JOLLY LLB हा सिनेमा पहा त्यातही हेच सांगितलंय 😉