बाहुबलीनंतर पहिल्यांदाच उदगीर च्या मल्टिप्लेक्समध्ये २ स्क्रीन्स ला रात्री ९ चा शो हाउस फूल गर्दीत सुरु होते. एका मराठी सिनेमा साठी जमा झालेली हि गर्दी आतुरतेने वाट बघत होती. तिकीट खिडकीवर लोकं तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन काही घोळके परतून गेले. मात्र एक घोळका तसाच थांबून होता. एका दूरच्या गावाहून खास सिनेमा पाहायला हि पंचविशीतली पोरं काही केल्या खिडकी सोडेनात. शेवटी खुर्च्या टाकून द्या आम्ही कुठेही कोपऱ्यात बसू अशा अटीवर हि पोरं उत्साहाने आत आली. जुगाड प्रवृत्तीचं हे अनोखं दर्शन आज सैराट च्या निमित्ताने घडलं. सिनेमा सुरु होण्याआधी सिनेमाची गाणी, राष्ट्रीय पुरस्कार, ह्या आठवड्याचं करोडो रुपयांच बम्पर ओपनिंग अशा अनेक चर्चा प्रेक्षकात रंगल्या होत्या. गप्पामध्ये मग्न असणारा आणि गलका करणारा हाच प्रेक्षक वर्ग मध्यंतरापर्यंत सिनेमा मध्ये रंगून झिंगाट झाला.झुणका (म्हणजेच बेसन/पिठलं) भाकर हे ग्रामीण भागातलं अस्सल खाद्य. ह्यात मराठमोळ्या मातीचा साधेपणा असला तरी चव मात्र भन्नाट. हिरवी मिरची टाकलेलं पिठलं जसं झणझणीत असतं तसाच हा सैराट. ह्यात गावरान रांगडेपणा आहे. कुठेही तोंड देखलेपणा नाही की सौजन्याची रेशमी झालर नाही. जे काही दिसतं वा ऐकू येतं ते सगळं अस्सल. लंगडा प्रदीप असेल किंवा सल्या, अर्ची असेल किंवा परश्या, प्रिन्स असेल किंवा मास्तर सगळी सिनेमात वावरणारी लोकं हि आपल्यापैकीच एक असून आपण त्यांना पाहिलंय वा अनुभवलंय असं जे प्रत्येक प्रेक्षकाला कळत नकळत वाटतं हेच खरं नागराज मंजुळेचं दिग्दर्शन व पटकथा लेखनातलं यश.

गावरान शिवराळ भाषा, गावाचा आत्मा असलेलं व डोळ्यांचं पारणं फेडणारं शेताचं रुपडं, खेळाच्या मैदानापासून ते कॉलेजच्या वर्गापर्यंत असलेला राजकीय दबदबा, पुरुषप्रधान संस्कृतीत अगदी निर्भीडपणे वावरणारी अर्ची, प्रेमधुंद झालेला देहभान विसरून निस्सीम प्रेम करणारा परश्या, पांढरपेशा असलेला अन मुस्कटदाबी सहन करणारा पण जातीयवादाची जुनाट बुरसटलेली विचारसरणी असलेला मास्तर, एकविसाव्या शतकातही असणारी जात पंचायतींची मक्तेदारी, माणुसकी हरवून बसलेली जातीयवादी माथेफिरू टाळकी अशा बहुरंगी पैलूंनी सजवलेला सिनेमा आपल्यासमोर नागराज एका व्यावसायिक चित्रपटाच्या स्वरूपात दिमाखदारपणे सादर करतो मात्र असे करताना तो कलात्मकतेच व वास्तववादाच भान हरपून बसत नाही ह्याचं मनापासून कौतुक करावं लागेल.

नागराज मंजुळेचा सैराट म्हणजे प्रेक्षकासमोर असणारा आरसा आहे ज्यात दोन निष्पाप जीवाचं प्रेम आहे, जीवाला जीव देणारी मित्र मंडळी आहेत तशीच जातीयवादाची पाळमुळ समाजात आणि राजकारणात किती खोलवर रुजली आहेत ह्याचं भयाण वास्तव देखील आहे. प्रेक्षकांमध्ये देखील अशी सगळ्याच प्रकारची मंडळी आपल्याला दिसतात. मास्तरला कानशि‍लात भडकावून दिल्यावर निशब्द होणारा प्रेक्षक आहे तसाच त्यावर खिद्ळून टाळ्या पिटणारा प्रेक्षक देखील तुम्हाला दिसेल. अतिशय सहजरीत्या व मुक्तपणे वावरणारी अर्ची बघून तिच्यासमोर धैर्यहीन वाटणारा परश्या बघून पुरुषी अहंकार  दुखावल्यामुळे परश्याला शिव्या देणारा प्रेक्षक आहे तसाच अर्चीला बुलेट चालवताना किंवा ओंगळवाण्या नजरेने बघणाऱ्या मुलाला तिच्या निर्भीड अंदाजाने सामोऱ्या जाणाऱ्या अर्चिला टाळ्या वाजवून दाद देणारा प्रेक्षकदेखील तुम्हाला दिसेल. पडद्यावर जसजसा चित्रपट उलगडत जातो तसतशा संमिश्र प्रतिक्रिया सिनेमागृहात उमटत जातात.

सिनेमाचा पूर्वार्ध झुणक्याच्या व भाकरीच्या गोडव्यासारखा भासतो. मात्र त्याच झुणक्यात शेवटी हिरवी मिरची लागावी अन ठसका लागुन डोक्यात झिणझिण्या याव्यात तसाच सिनेमाचा शेवट डोकं सुन्न करतो. २ तास हसणारी खिदळणारी टाळकी हळहळत, अतिशय शांततेत बाहेर पडतात मात्र ह्याच प्रेक्षकांना सिनेमा विचारमग्न व्हायला भाग पाडतो ह्यासारखं सुख कुठल्याही बॉक्स ऑफिस च्या आकड्यात किंवा पुरस्कारात नाही हे मात्र नक्की. अतिशय सुंदररित्या चित्रित व मनाचा ठाव घेणाऱ्या संगीताने सजलेला सैराट एकदातरी चित्रपट गृहात जाऊन अनुभवा, नक्कीच तुम्ही ‘सैराट झालो जी’ म्हणत सिनेमागृहाच्या बाहेर पडाल ह्याची खात्री मला आहे. अशी हि अविस्मरणीय कलाकृती निर्माण  करणाऱ्या (पडद्यावरच्या व पडद्यामागच्या) सर्व कलाकारांचे धन्यवाद!

image courtesy: zee studios, gif source: travelindia